दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, या आठवड्यात निकालाची घोषणा?


 या आठवड्याच्या अखेरीस महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर दहावी निकालाची घोषणा होण्याची शक्यता


मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार या आठवड्याच्या अखेरीस महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर दहावी निकालाची (SSC results 2021) घोषणा होण्याची शक्यता आहे.

दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागेल अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. दरम्यान, शाळांकडून सुरु असलेले दहावीच्या निकालाचं काम अखेरच्या टप्प्यात आहे. तसंच विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण सिस्टीममध्ये भरण्याचे काम देखील पूर्ण होत आले आहे. शाळांकडून विद्यार्थ्यांच्या गुणांची माहिती विभागीय मंडळाकडे येणार आहे. त्यानंतर ही सर्व माहिती एकत्र करुन दहावी परीक्षेचा अंतिम निकाल तयार करण्यासाठी प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे या आठवड्याचा अखेरपर्यंत दहावीच्या निकालाची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राज्यातील शाळांकडून इयत्ता दहावीच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण संगणकीय प्रणालीत भरण्याचे 99 टक्के काम पूर्ण झालं आहे. शाळांकडून विद्यार्थ्यांच्या गुणांची आलेली माहिती एकत्रित करून अंतिम निकाल तयार करण्यासाठी विभागीय मंडळाकडून राज्य मंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात येतील, अशी माहिती आहे.